प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासगी सचिव म्हणून सुमित वानखेडे यांची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात ओळख आहे. ते मूळचे आर्वीकर तर त्यांची सासुरवाडी वर्धेची. मात्र त्यांचा सर्वाधिक वेळ जातो ते जनतेच्या समस्या ऐकण्यात. फडणवीस मुख्यमंत्री असतानातर वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना आर्वी मतदारसंघात खेचून आणल्या होत्या.
हेही वाचा >>> बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी
आता परत त्यांच्या भेटीचा सपाटा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आर्वी विश्रामगृहात भाजप नेत्यांशी चर्चा करीत समस्या समजून घेतल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या सूचनेनुसार अधिकारी कामाला लागल्याचे दिसूनही आले. त्यामुळे आर्वीचे आमदार दादाराव केचे की सुमित वानखेडे, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात असतो. पण यातच एक मेख अशी की, आर्वी मतदारसंघात फार कमी मताधिक्याने भाजपला विजय मिळाला. अशा ठिकाणी उमेदवार बदलाचे सूत्र गुजरातप्रमाणे ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात असते. त्यात वानखेडे यांचे नाव अग्रक्रमावर आहे. ते स्वतः म्हणतात की मी या भागात आलो की लोकं भेटायला येतात.
हेही वाचा >>> अमरावती : मेंढ्या, पाळीव जनावरे बेपत्ता होण्याचे रहस्य अखेर उलगडले…
मी कार्यक्रमास आलो पाहिजे असे त्यांना वाटतं. राजकीय भाष्य ते टाळतात. कारंजा नगरपंचायतला भाजप सत्तेत नसल्याने तिथल्या भाजपच्या नगरसेवकांना निधी कुठून मिळतो, याचे उत्तर वानखेडे यांच्या नावाशी येऊन थांबत असल्याने राजकीय वाऱ्याची दिशा स्पष्ट व्हावी. एका नेत्याने निदर्शनास आणले की, फडणवीस यांचे एक खासगी सचिव मराठवाड्यातून आमदार झालेच आहे, दुसरे नाव भविष्यात वानखेडे यांचे राहिले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.