राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या अमृता सध्या नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयाच्या कार्यक्रमात अमृता यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी त्यांनी आपण कोणत्या एका व्यक्तीला घाबरतो याबद्दल भाष्य करतानाच ट्रोलर्सलवरही निशाणा साधला.
मुलाखतीदरम्यान अमृता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत,” असं अमृता एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. याच मुलाखतीमध्ये ट्रोलर्ससंदर्भात अमृता यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.
“माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत. मला व्यक्त व्हायला आवडतं. या व्यक्त होण्याचा कधी मला तर कधी देवेंद्रजींना तोटा सहन करावा लागतो. मात्र असं असलं तरी मी आता व्यक्त होत आहे. मी व्यक्त व्हायला मुळीच घाबरत नाही. मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. या ट्रोलर्सकडे बराच वेळ असतो. मात्र हे ट्रोलर्स म्हणजे महाविकास आघाडीने पाच पैसे देऊन ट्विटरवर पाठवलेली फौज आहे,” असं अमृता म्हणाल्या.
नक्की वाचा >> “माझी कमाई देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त कारण त्यांनी कधी पैसे…”; नागपूरमधील जाहीर कार्यक्रमात अमृता फडणवीसांचं विधान
आपण ट्रोलर्सला घाबरत नाही हे सांगताना अमृता फडणवीस यांनी केवळ एका व्यक्तीला आपण घाबरतो हे ही मान्य केलं. “मी माझ्या आईंना (सासू) सोडून कुणालाच घाबरत नाही,” असंही अमृता म्हणाल्या. न्यायमूर्ती म्हणून अॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.