नागपूर : जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम मदतीला धावली असून जेथे-जेथे पर्यटक थांबले आहेत. त्या ठिकाणी शिंदे यांचे कार्यकर्ते पोहचले असून भेदरलेल्या पर्यटकांना धीर देण्याचे काम करीत आहेत.

श्रीनगर, सीआरपीएफ कॅम्प, बडगाव येथे थांबलेल्या नागपुरातील ४१ पर्यटकांची भेट शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आज घेतली आणि त्यांना नागपूर सुखरूप पोहोचवण्याचे आश्वासन दिले. नागपुरातील समतानगर येथील ज्ञानेश्वर जुम‌ळे यांच्यासोबत महिला, पुरुष आणि बालक असे एकूण ४१ लोकांचा ग्रुप जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेला आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा हा ग्रुप श्रीनगर येथून पहलगाम निघाला होता. रामबन येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळ‌ल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे पुढे जाता येत नव्हते. म्हणून आम्ही सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये थांबलो. पहलगाम येथून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही पहलगाम येथे खासगी हॉटेलमध्ये थांबणार होतो, असे बटालियन हवालदार मेजर ज्ञानेश्वर जुमडे (निवृत्त) यांनी लोकसत्ताला सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील १९४ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यातील बहुतांश श्रीनगर येथे आहेत. तर दोन पर्यटक पहलगाम येथे आहेत. यापैकी एक जखमी आहे. श्रीनगर येथे अडकलेले काही पर्यटक २३ ते २७ एप्रिलदरम्यान विमानाने आणि काही रेल्वेगाडीने नागपूरकडे परतण्याच्या तयारीत आहेत. नागपुरातील भगवाननगर, बेसा, मानेवाडा, मनिषनगर, वेंकटेशनगर, समतानगर, इंदोरा, जरिपटका येथील रहिवासी आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्याला आला. या ठिकाणाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. हे ठिकाण सुंदर असल्याने अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. 

जिल्हा मुख्यालयापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पर्यटक घोडेस्वारी, झिपलाइनिंग, झॉर्बिंग इत्यादी साहसी उपक्रम करण्यासाठी येतात. याशिवाय कॅम्पिंगसाठी देखील हे ठिकाण लोकांमध्ये लोकप्रिय आहे. 

मेंढपाळांचे खोरे पहलगाम व्हॅलीला मेंढपाळांची व्हॅली किंवा वैली ऑफ शेफर्ड म्हणूनही ओळखले जाते कारण गुज्जर-बकरवाल समुदाय येथे उंच पर्वतांवर असलेल्या तलावांच्या काठावर राहतात. एप्रिल-मे हंगामात ही लोकवर जातात आणि ऑक्टोबरमध्ये परत खाली येतात. येथे मेंढ्यापालन अधिक प्रमाणात होते. जगप्रसिद्ध पश्मीना शाल या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवल्या जातात, जे जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांची किंमत २० हजार रुपयांपासून सुरू होऊन लाखो रुपयांपर्यंत जाते.