मृत जनावरांची विल्हेवाट सरळ तलावात
सध्या संपूर्ण देशात गोरक्षक आणि त्यांची गोसेवा, या मुद्दय़ावरून वादंग माजलेले असतानाच संघभूमी असलेल्या नागपूर जिल्ह्य़ातील कुही तालुक्यात संघाशीच संबंधित बजरंग दलाच्या माजी पदाधिकाऱ्यानेच गोसेवेच्या नावाखाली गायींची विटंबना सुरू केली आहे. गोसंवर्धनासाठी गोळा केलेल्या गायींच्या देखभालीकडे या गोरक्षकाचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे तेथील गायींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, या मृत गायी हा गोरक्षक सरळ तलावात फेकून देत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कुही तालुक्यातील टिल्ली गावातील दत्तुराम जिभकाटे, असे या स्वयंघोषित गोरक्षकाचे नाव आहे. कुहीच्याच गोहत्या निवारक प्रचार समितीचा तो संचालक आहे. ‘गोरक्षण’ या नावाचा ट्रस्टही त्याने स्थापन केला आहे. गावातील अडीच एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्याने १९९० पासून गोशाळा सुरू केली आहे. त्या भागातून कसायांकडून सोडविण्यात आलेली किंवा पोलिसांनी पकडून दिलेली जनावरे या गोशाळेत पालन पोषणासाठी ठेवली जातात. सद्य:स्थितीत तेथे सुमारे १७५ जनावरे आहेत. त्यातील शंभरावर मरणासन्न अवस्थेत असून त्यांच्या आरोग्याकडे या गोरक्षकाचे सपशेल दुर्लक्ष झालेले आहे. आतापर्यंत येथील ३० ते ३५ गायी दगावल्याची माहिती असून या मृतांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्याकडे कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे ही जनावरे तो सरळ गावातील तलावात फेकून देत आहे, त्यामुळे तेथील पाणी व परिसरातील वातावरणही प्रदूषित झाले आहे. मध्यंतरी येथील काही गायी कसायांना विकल्याचीही तक्रार होती. त्यावरून पोलिसांनी जिभकाटेवर कारवाईसुद्धा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
मृत गायी तलावात फेकून देण्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा मृत जनावरांचे आम्ही दफन करतो. हा दत्तुराम जिभकाटे बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे की नाही, याची माहिती नाही. मात्र, त्याबाबत त्याची चौकशी केली जाईल. गोरक्षणाच्या नावाखाली गायींची अशा पद्धतीने विटंबना केली जात असेल तर ते योग्य नाही.
– राजकुमार शर्मा, बजरंग दल नागपूर प्रांत संयोजक
कसायांकडून सोडवलेल्या गायी गोशाळेत आणल्या जातात. येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या जनावरांवर उपचार करू शकत नाही. मग मेलेली जनावरे तलावात फेकण्याशिवाय पर्याय नाही. गायींची विटंबना मात्र होत नाही. कोणी कितीही आरोप केले तरी मी गोसेवा अखेपर्यंत करीतच राहणार.
– दत्तुराम जिभकाटे, संचालक, गोहत्या निवारक प्रचार समिती, कुही
जिभकाटे कोण?
दत्तुराम जिभकाटे हा आपण बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो. सुरुवातीला त्याच्याकडे मोजकीच जनावरे होती. त्या वेळी तो त्यांची व्यवस्थित देखभाल करीत होता, पण नंतर कसायांकडून आलेल्या गायींची संख्या वाढल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत गेले. गोशाळेत चाऱ्याचाही तुटवडा आहेच. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. गायींच्या या विटंबनेकडे हिंदुत्ववाद्यांचेही कसे काय दुर्लक्ष झाले, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.