नागपूर : अमरावती मार्गावरील बाजारगाव परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बाजारगाव येथून जवळच असलेल्या चनकापूर (माळेगाव) शिवारात एका गावकऱ्याला नदीपात्रात सुमारे तीन ते चार वर्षांची वाघीण पडून असल्याचे दिसले. त्याने वनखात्याला माहिती दिली. उपवनसंरक्षक पी. जी. कोडापे, साहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, आशीष निनावे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिना राठोड, विजय गंगावणे, कापगते, सारिका वैरागडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाघिणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर गोरेवाडय़ातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोलंगथ, ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे डॉ. सुदर्शन काकडे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किशोर भदाने यांनी शवविच्छेदन केले.
प्राथमिक अहवालात वाघिणीचे हृदय आणि श्वसननलिका बंद पडल्याचे स्पष्ट झाले. विषबाधा किंवा विद्युत प्रवाहाने वाघिणीचा शिकार करण्यात आली आणि मृतदेह नदीपात्रात आणून टाकल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. मात्र, वाघिणीचे सर्व अवयव शाबूत होते. शवविच्छेदनानंतर वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुख्य वन्यजीव रक्षक तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर व मानद वन्यजीव रक्षक उधमसिंग यादव उपस्थित होते. दरम्यान, ज्या सरपंच आणि पोलीस पाटलांनी वन खात्याला ही माहिती दिली, त्यांनाच घटनास्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती.