यवतमाळ : पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे शुक्रवारी चार घरांना भीषण आग लागली. या घटनेत एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. थावरा भोजू पवार (७५) असे मृताचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंगरवाडी येथे येथील सुभाष थावरा पवार (५०) हे शुक्रवारी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपले असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांचे वडील राहत असलेल्या गोठावजा घराला भीषण आग लागल्याचे दिसले. त्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग अधिकच पसरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आगीने लगतच्या चार झोपड्याही कवेत घेतल्या. आगीत एकनाथ भिका जाधव, अनिल सीताराम पवार, केशव फकिरा राठोड यांची घरेही जळाली. थावरा भोजू पवार यांना गावकऱ्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. या घटनेत थावरा पवार यांचा होरपळून मृत्यू झाला.

हेही वाचा…सोमवारपासून पुन्हा पाऊस…..

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग आडे, पोलीस कर्मचारी प्रकाश चव्हाण यांनी तातडीने पुसद अग्निशमन विभाग व पोलिसांना कळविले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीला आटोक्यात आणले. आज शनिवारी सकाळी घटनेचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार महादेव जोरवर व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृत थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. शासनाने पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deadly fire in yavatmal s singarwadi village of pusad tehsil one elder man dead destroys four houses nrp 78 psg