महाविद्यालय प्रशासनातील गटबाजी उघड
येथील मेडिकलमध्ये एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नावरून विद्यार्थी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला खुद्द अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांचीच फूस असून यानिमित्ताने या महाविद्यालय प्रशासनात सुरू असलेली अंतर्गत गटबाजी सुद्धा समोर आली आहे.
मेडिकलमध्ये निवासी डॉक्टर असलेल्या नितीन शरणागतने दोन दिवसांपूर्वी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी तसेच आंतरवासी विद्यार्थ्यांनी डॉ. व्यवहारे हटाव अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दोन्ही संघटनांच्या या आंदोलनाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचीच फूस असल्याची बाब आता समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे म्हणून डॉ. निसवाडे हे स्वत: संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले. अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी संपर्क साधला. एवढेच नाही तर आंदोलन करताना मागणीपत्रात डॉ. व्यवहारेंना मेडिकलमधून हाकला हा मुद्दा अग्रक्रमावर ठेवा, असेही त्यांनी संघटनेला सांगितले व नंतर स्वत:च ते या आंदोलनाला सामोरे गेले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. निसवाडेंनी एक समिती गठित करण्याची घोषणा केली. या समितीत महाविद्यालयातील एकाही प्राध्यापकाने सहभागी होऊ नये, असा निरोप त्यांनीच सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. एकूणच हे प्रकरण आणखी चिघळत कसे ठेवता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मेडिकलमधील प्राध्यापक दोन गटात विभागले गेले आहेत. विरोधी गटातला एखादा प्राध्यापक अडचणीत सापडला की विद्यार्थ्यांना समोर करून त्याचा काटा काढायचा असे प्रकार यापूर्वी अनेकदा या महाविद्यालयात घडले आहेत.
गटबाजीच्या राजकारणातून विरोधी गटातील प्राध्यापकांच्या बदल्या करवून घेणे, चौकशीत अडकवणे असे प्रकार मेडिकलमध्ये सर्रास चालतात. आता एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे निमित्त साधून डॉ. व्यवहारेंना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. डॉ. नितीन शरणागतच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे हे प्रकरण गंभीर आहे. यात डॉ. व्यवहारे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी पण प्रकरण हाताळताना खुद्द अधिष्ठाताच राजकारण करीत असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझी फूस नाही -डॉ. निसवाडे

विद्यार्थ्यांना आंदोलन करायला मी बाध्य केले, या म्हणण्यात काही अर्थ नाही. आरंभापासून मी हे प्रकरण हाताळत आहे. त्यामुळे आंदोलनाला माझी फूस आहे, या आरोपात काही तथ्य नाही. प्रारंभी चौकशी समितीत सहभागी व्हायला सहकारी प्राध्यापक तयार नव्हते. आता ते तयार झाले आहेत. डॉ. राऊत, डॉ. पाटील व डॉ. भातकुळे यांची समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यावर मी अधिक भाष्य करू शकेल, असे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader