दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूचे व्यसन जडलेल्या व्यक्ती गावोगावी सापडतात.संसार उध्वस्त होतात म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था सातत्याने करतात.असे काही नसल्याने व्यसनी व्यक्तीचे कुटुंब आपापल्या परीने उपाय करण्याचा प्रयत्न करतात.त्यात घातही होतो,याचा पुरावाच पुढे आला आहे.
समुद्र्पुर तालुक्यातील झुणका येथील मंगेश दामोधर जामूनकर या चाळीस वर्षीय इसमास दारूचे व्यसन जडले होते. पंधरा वर्षांपासून दारू पिणे सुरू असल्याने कुटुंब त्रस्त झाले होते. त्यालाही दारू पासून सुटका करायची असल्याने त्याने उपाय शोधणे सुरू केले. त्यात त्याला एका परिचित व्यक्तीने पारंपरिक सल्ला दिला. आयुर्वेदातील औषधी सांगितली. ही जडीबुटी उपयोगी ठरेल म्हणून त्याने औषधी घेतली. मात्र काही क्षणातच मंगेशची तब्येत बिघडली. घाबरलेल्या लहान भाऊ सचिन याने त्यास सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले.पण उपचारादरम्यान मंगेशचे निधन झाले.
गिरड पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे.जडीबुटी सांगणारा अद्याप पुढे आला नाही.