नागपूर : भंडारा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील देवनारा कक्ष क्र. ६२ मध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण राज्यात यावर्षी २२ वाघमृत्यू दाखवत असले तरी प्रत्यक्षात ते अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
नेमके काय झाले?
१४ ते १६ महिने वय असलेल्या वाघाच्या मागच्या पायाला मार लागलेला होता. आतडे तुटलेले होते आणि मानेला प्रचंड मार लागला होता. त्यामुळे हलक्या वाहनाने वाघाला रस्त्यावर धडक दिली असावी, असा अंदाज आहे. कारण रस्त्यावर वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. या मृत्यूची माहिती कळताच मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले. गोबरवाहीचे पोलीस निरीक्षक विनोद गिरी व त्यांच्या चमुने गर्दीवर नियंत्रण आणले. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात, प्रकाष्ट निष्काशन अधिकारी रितेश भोंगाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य करीत आहेत.
शवविच्छेदन अहवाल काय?
दरम्यान, पशुधन विकास अधिकारी डॉ. बारापात्रे, डॉ. शुभम थोरात, डॉ. सुरज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेघराज तुलावी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून सीट या स्वयंसेवी संस्थेचे शाहीद खान व प्रधान मुख्य वन संरक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख उपस्थीत होते. शवविच्छेदनानंतर वाघाचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्रात किती वाघ मृत्युमुखी?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशभरात १२४ तर महाराष्ट्रात २२ वाघ मृत्युमुखी पडले. प्रत्यक्षात ही आकडेवारी जास्त असल्याचा अंदाज वन्यजीवप्रेमींचा आहे. मध्य प्रदेशात तब्बल ४६ वाघ मृत्युमुखी पडले. या वर्षात वाघांचे नैसर्गिक मृत्यू कमी आणि रस्ते अपघात व इतर वर्षांतील वाघांचे मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. यावर्षीदेखील शिकारीच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणातील चौकशी सुरू आहे. वाघांचे अपघाती मृत्यू आणि संशयास्पद मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे.
हेही वाचा – गडचिरोलीत मानव-वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात रानटी हत्ती, वाघाच्या हल्ल्यात १० बळी
संशयास्पद घटना कोणत्या?
मेळघाट प्रादेशिक चिचपल्ली वनविभागाच्या परतवाडा अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळून आला. यात वाघाचे तीन पंजे नव्हते व एक पंजाला नख नव्हते. चंद्रपूर जिल्ह्यातदेखील वनपरिक्षेत्राच्या मूल उपक्षेत्रातील चिरोली नियतक्षेत्रांतर्गत नलेश्वर येथे वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उघडकीस आले होते. जिवंत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पाच महिन्यांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला होता. तीन दिवस कुऱ्हाडीच्या सहाय्याने तुकडे करून या वाघाचे अवयव जाळण्यात आले. ३० डिसेंबरला चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा येथे वनविभागाने चार वाघ नखांसह दोघांना अटक केली.