अमरावती : येथील विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातून शनिवारी सायंकाळी एका बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केल्यानंतर रविवारी सकाळी दुसरा एका बिबट मृतावस्थेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दोन बिबट्यांच्या संघर्षांतून या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. अमरावती विद्यापीठाच्या मागच्या बाजूला रविवारी सकाळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आल्यावर या भागात परिसरातील लोकांची सकाळीच गर्दी उसळली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा – यवतमाळ : प्रेमाच्या आणाभाका एकीशी अन घरोबा दुसरीसोबत…
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस हे आजही अविवाहित”, आमदार भास्कर जाधव असे का म्हणाले?
वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी वडाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. अमरावती विद्यापीठ आणि लगतच्या तपोवन परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागात पाच ते सहा बिबट असल्याची माहिती आहे. विद्यापीठ तसेच तपोवन परिसरातदेखील अनेकांच्या घराबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्यांच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठ परिसरामागे मृतावस्थेत आढळून आलेला बिबट हा दोन बिबट्यांच्या झुंजीत ठार झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.