गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत टी-९ या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी नागझिरा -१ कक्ष क्रमांक ९६ मध्ये मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन विभाग व वन्यजीव विभागाकडून शिकारीच्या घटनांवर अंकुश लावण्यात आल्यानंतर वन्यप्राण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहता गोंदिया व भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. वाघांच्या अधिवासासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरण असल्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या आता वाढत असल्याचे शुभ संकेत मिळत असताना जिल्ह्याच्या चौफेर वाघांचा अधिवास आहे. विशेष म्हणजे, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल हा मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. ज्यामध्ये नागझिरा ते पेंच, नागझिरा नवेगाव- ताडोबा, नागझिरा-उमरेड, पवनी, कऱ्हांडला अभयारण्य असा एक कॉरिडोर आहे. त्यामुळे वनपरिसरात हमखास वन्यप्राण्यांचा संचार दिसून येत असतानाच वाघाचाही हा भ्रमणमार्ग आहे.

मागील २०२२ च्या गणनेनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जवळपास २२ वाघ असल्याचे अंदाज असून यात ३ नर व ७ मादा वाघिणीसह अडीच ते तीन वर्षीय दोन वाघ व छाव्यांचा समावेश आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वाघिणींना नवेगाव नागझिऱ्यात सोडण्यात आल्याने वाघाच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वासाठी या वाघांची झुंज सुरू झाल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे. आज रविवारी वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्याअंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक जे. एस. केंद्र, नागझिरा १ हे आपल्या चमुसह नियमीत गस्तीवर असताना साधारणतः सकाळी १० वाजताच्या सुमारास एक नर वाघ अंदाजे वय वर्षे ९ ते १० मृतावस्थेत दिसून आला.

हेही वाचा – चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा!

या घटनेबाबतची माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तत्काळ वरिष्ठ वनअधिकारी यांना कळविली. घटनेची माहिती प्राप्त होताच नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर., नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोलीचे उपसंचालक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक, (अति.कार्य.) एम.एस.चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एम. भोसले, घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपद्धतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये यावेळी मानद वन्यजीव रक्षक तथा प्रतिनिधी मुख्य वन्यजीव रक्षक सावन बहेकार, NTCA प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, NGO प्रतिनिधी छत्रपाल चौधरी, डॉ शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, डॉ. उज्वल बावनथडे, पशुवैद्यकिय अधिकारी यांचा समावेश होता. पुढील तपास नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक राहुल गवई, यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले करीत आहेत.

पंचासमक्ष उत्तरीय तपासणी…

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे चमुद्वारे समिती सदस्यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व वाघाचे व्हिसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – नागपूर : संशोधित गिधाडाचे यशस्वी पुनर्वसन

शवविच्छेदानंतर अंत्यसंस्कार…

मृत टी-९ वाघ दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीमध्ये गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असवा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले आहे.