शेगावनजीकच्या श्री क्षेत्र नागझरी येथील मन नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले दोघे जण बुडाले. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. आदित्य गौतम इंगळे (१७, रा.पंचशिल नगर, शेगाव), नरेंद्र सुरजसिंग चव्हाण उर्फ छोटू (१७, रा.पंचशिल नगर शेगाव) आणि राम प्रभाकर अंजनकर (१९, रा.आळसणा ता. शेगाव) हे तिघे मित्र नागझरी येथील नदीवर पोहण्यासाठी गेले.

हेही वाचा : चंद्रपूर : आसोलामेंढा नहरात पाच मुले बुडाली; चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता

आदित्य व राम हे दोघे नदीत उतरले तर छोटू काठावरच उभा होता. दरम्यान, पोहता येत नसल्यामुळे आदित्य आणि राम पाण्यात बुडाले. छोटूने मच्छीमारांकडे मदतीसाठी धाव घेतली. मच्छीमार व उपस्थित नागरिकांनी आदित्यला पाण्याबाहेर काढले. मात्र, रामचा बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी रात्री रामचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे शेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader