यवतमाळ : येथील पोलीस दलात गेल्या आठ वर्षांपासून सेवा देत असलेल्या ‘लुसी’ श्वानाच्या मृत्यूने पोलीस दलही हळहळले. गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेल्या लुसीने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. येथील पोलीस मुख्यालयात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा अनेक पोलिसही भावूक झाले होते. लुसीने आव्हानात्मक ठरलेल्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोलाची मदत केली होती.
पोलीस दलात श्वानाला फार महत्त्व आहे. गुन्हे प्रकटीकरण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींमध्ये श्वान पथक हा विभाग महत्वपूर्ण कामगिरी बजावत असतो. जिल्ह्यात एखादा गंभीर गुन्हा घडला की, पूर्वी अमरावती येथून श्वान पथकास पाचारण करावे लागत असे. मात्र, मागील काही वर्षापूर्वी स्वतंत्र श्वान पथकाची निर्मिती करण्यात आली. गुन्हे शोधक, अंमली पदार्थ शोधक व बॉम्बशोधक असे विभाग करण्यात आले. चोरी, घरफोडीसह खुनाच्या गंभीर घटनांचा शोध घेण्यासाठी या पथकात लुसी श्वान दाखल झाले. २०१६ मध्ये जन्मलेल्या मादी जातीच्या लुसी या श्वानाची दोन महिन्यांची असताना पोलीस दलात नियुक्ती झाली. त्यानंतर पुणे येथे नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर लुसी खऱ्या अर्थाने पोलीस दलात दाखल झाली होती. जिल्हा पोलिस दलात तब्बल आठ वर्षापासून अनेक आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात लुसीने पोलिसांना सहकार्य केले.
पोलीस दलात प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर लुसीचा दिनक्रमही ठरविण्यात आला. तिची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र प्रभारी पोलीस अधिकारी संतोष कडू, कर्मचारी किशोर येडमे, प्रकाश शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली. लुसीचा दिनक्रम सकाळी सहा वाजता सुरू व्हायचा. तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जायचे. एखादा गुन्हा घडल्यानंतर तपासासाठी श्वानाची आवश्यकता असल्यास लुसीला पाचारण केले जात असले. तिचा सांभाळ करणारे अधिकारी तिला घटनास्थळी न्यायाचे. दोन महिन्यांपूर्वी लुसीची प्रकृती अचानक बिघडली होती. तिच्यावर पोलीस दलातर्फे सर्वतोपरी उपचार करण्यात आले. मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर शनिवारी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूने पोलीस दलातील तपासात महत्वाची भूमिका बजावणारा सहकारी निघून गेल्याने पोलीस दलातही हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस मुख्यालयात अखेरची सलामी देत लुसीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लुसीने पोलीस दलात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना तिचा सांभाळ करणाऱ्या पथकाने तिला निरोप देताना व्यक्त केल्या.