वर्धा : हिंगणघाटलगत पिंपळगाव येथील सीमा मेश्राम या महिलेस सर्पदंश झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राथमिक उपचार करण्याची मागणी केली. मात्र ती धुडकावून लावत येथील डॉक्टरांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्याच्या सल्ला दिला. त्यासाठी आवश्यक रेफर पेपर, ऑक्सीजन सिलिंडर, रुग्णवाहिका अशी मदत केली नसल्याचा आरोप आहे.
उपचारात दिरंगाई व विषारी दंश यामुळे वाटेतच सीमा यांचा मृत्यू झाला. हा डॉक्टर व रुग्णालयाचा हलगर्जीपणा आहे, असा आरोप करीत मृत महिलेचे पती किशोर मेश्राम, सर्पमित्र प्रवीण कडू, मनोज सलामे यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच दोषी रुग्णालय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.