विहिरीतील गाळ स्वच्छ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन मजुरांचा विहिरीत बेशुद्ध पडून मृत्यू झाला. दोघांच्याही मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसून पाण्याच्या मोटारमधून विजेच्या धक्क्याने किंवा विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना काल रविवार दुपारी सदरमधील राजनगरात घडली. शंकर अर्जुन उईके (२२, मानेवाडा, गोंडवस्ती) आणि अमर रतनलाल मरकाम (२२, रा. गोंडवस्ती) अशी मृत मजुरांची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरमधील राजनगर-एसबीआय कॉलनीत येथे डॉ. सुनील राव हे राहतात. त्यांच्याच इमारतीत ढोके, आटले आणि सोनी हे तीन कुटुंब राहतात. त्यांच्या घरी एका सामूहिक विहिरीतून पाणी येते. मात्र, त्या विहिरीत घाण आणि गाळ साचल्याने त्यांनी विहिरीचा उपसा करण्याचे ठरवले. त्यांनी गोंडवस्ती येथे राहणारे शंकर उईके, अमर मरकान आणि अन्य एका सहकाऱ्याला विहिरीच्या स्वच्छतेच्या कामाचा ठेका दिला. रविवारी दुपारी दोन वाजता तीनही मजुरांनी विहिरीतून गाळ काढला. तिघेही विहिरीबाहेर आले आणि उर्वरित गाळ काढण्यासाठी शंकर आणि अमर विहिरीत उतरले. काही वेळातच ते दोघेही विहिरीत बेशुद्ध पडले. हा प्रकार तिसऱ्या मजुराच्या लक्षात आला. त्याने घरमालकाच्या मदतीने दोघांनाही मेयो रुग्णालायात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दोन मजुरांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी राजनगरात गर्दी केली.विहिरीतील गाळ बाहेर काढल्यानंतर अमर आणि शंकर विहिरीत पुन्हा उतरले होते. यादरम्यान घरातील कुणीतरी विहिरीतील मोटारचे बटन दाबले असावे, असा संशय आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेनेसुद्धा तपास करीत आहेत. तसेच विहिरीत विषारी वायू तयार झाल्याने त्या वायूमुळेही मजुरांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मजुरांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, यावेळी तणाव निर्माण झाला होता. वेळीच अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले.