वर्धा : पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्याचे धाडस दोघांच्या जिवावर बेतले. ही घटना सोमवारी रात्री सालई ते बोर मार्गावरील पुलावर घडली.
सोमवारी रात्री अंकुश नागो चौधरी व इस्राईल पठाण हे आपल्या दुचाकीने काही कामासाठी घराबाहेर पडले होते. दोघेही सेलू तालुक्यातील सालईकडून रात्री उशिरा बोरधरणमार्गे हिंगणीच्या दिशेने परत येत होते. सोमवारी दिवसभर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सालई ते बोर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. हा पूल उतारावर व धरणालगत असल्याने पाण्याला मोठी ओढ होती. रात्री याच पुलावरून या दोघांनी दुचाकी चालवून नेण्याचे धाडस केले व त्यात ते वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
हेही वाचा – आठवले यांचा पवारांना सल्ला, म्हणाले, “देशहितासाठी मोदींसोबत..”
आज सकाळी बोरी येथील काहीजण नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. तेव्हा या दोघांचे मृतदेह पुलापासून काही अंतरावर झाडाच्या फांद्यात अडकून पडल्याचे त्यांना दिसले. तसेच दुचाकीही नदीच्या पात्रात आढळून आली. मृत इस्राईल (रा. हिंगणी) तसेच अंकुश (रा. बोरी) यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. सेलू पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला.