अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यक्तीने अश्लिल शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रवी राणा यांच्या स्वीय सहायकाने येथील राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
रवी राणा यांच्या मोबाईलवर संभाजीनगर येथील एका व्यक्तीने संपर्क साधला. महाराष्ट्रात फिरणे बंद करा, अन्यथा तुमच्या जिवाचे बरेवाईट करू, अचानक काही घडले किंवा अपघात झाला, तर काही म्हणू नका. तुमच्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्ला करणार आहेत. तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आमच्या विरोधात कसे काय बोलता, हे आम्ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रवी राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.