अमरावती : खासदार नवनीत राणा यांना पुन्‍हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्‍यात आली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना ही धमकी आल्याचे सांगण्‍यात आले आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअ‍ॅपवर एक ध्‍वनिफित पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या व्‍यक्‍ती विरुद्ध विविध कलमान्‍वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपुरात कॉंग्रेसचा तुल्यबळ उमेदवार?

हेही वाचा – रणजी करंडक : मध्यप्रदेशला पराभूत करत विदर्भ संघ अंतिम फेरीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक ध्‍वनिफित पाठविण्‍यात आली होती. यामध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांची ही ध्‍वनिफित आहे. गेल्‍या ३ मार्च रोजी दुपारी २ वाजून ९ मिनिटांनी ही ध्‍वनिफित नवनीत राणा यांच्‍या व्‍हॉट्सअ‍ॅपवर आली होती. त्‍यानंतर २ वाजून १३ मिनिटांनी याच क्रमांकावरून व्‍हॉट्सअ‍ॅप व्‍हाईस कॉल करण्‍यात आला, तो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्‍यानंतर पुन्‍हा दुपारी आणखी एक ध्‍वनिफित आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे देखील नाव घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवले तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे. सहा महिन्‍यांपूर्वी नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर संपर्क साधून एका व्‍यक्‍तीने चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी दिली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to mp navneet rana again from pakistan and afghanistan mma 73 ssb