अमरावती : अमरावती विमानतळाला शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली जात असतानाच विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचे नाव देण्यात यावे, असा ठराव चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थानने पारित केला आहे. संस्थानचे विश्वस्त रमेश मोहोड यांनी मांडलेल्या या प्रस्तावाचे साहेबराव मोहोड यांनी अनुमोदन केले असून, त्यादृष्टीने कार्यवाही केली जावी, अशी मागणी केली आहे. हा ठराव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही ठरावात करण्यात आली आहे.श्री क्षेत्र माधान हे संत गुलाबराव महाराज यांचे मूळ गाव आहे. धर्माचार्य, प्रज्ञाचक्षू, ज्ञानेशकन्या, संत गुलाबराव महाराज यांना १९०९ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी स्वतःच्या मांडीवर घेऊन स्व-नामाचा मंत्र दिला होता. संत गुलाबराव महाराजांनी माधुर्यभक्ती करून श्रीकृष्णांना आपले पती व माऊलीला पिता मानले. त्यांनी योगशास्त्र, संगीतशास्त्र, काव्यशास्त्र, आयुर्वेद, नीतिशास्त्र आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा परामर्श घेऊन इतिहास, सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान मांडले. त्यांनी नवीन नावंगलीपी तयार करून स्वतः आपला माऊली संप्रदाय स्थापित केला. त्याच सांप्रदायिक मंडळींनी महाराज हयात असताना ग्रंथलेखन करुन त्यांचे विचार समाजात जबाबदारीने उभे केले. त्यामुळे बेलोऱ्यापासून जवळ असलेल्या लोणी या त्यांच्या जन्मगावाचा विचार करता विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी विनंती संस्थानने केली आहे.
लोणी टाकळीशी असा आहे संबंध
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अल्पायुषी होते. ते केवळ ३४ वर्षे जगले. एवढ्या कमी वयात ज्यांनी १३४ ग्रंथ दिले. ज्यांचा जन्म लोणी टाकळी या त्यांच्या मामांच्या गावी झाला. हे गाव विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. शिशु वयातच नवव्या महिन्यात त्यांची दृष्टी गेली. पुढे ते माधान येथे वास्तव्यास होते, अशी माहिती श्री संत गुलाबराव महाराज संस्थानने दिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावे
विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशी मागणी आहे. त्यांच्या नावाने श्री शिवाजी शिक्षण संस्था तसेच अकोला येथे कृषी विद्यापीठ आहे. त्यांचे शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना भारतरत्न ही पदवी बहाल करावी, अशी मागणीही संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केली आहे.