नागपूर: गणेश टेकडी मंदिर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्याचा मलबा आता वर्धा मार्गावरील धंतोलीतील श्रीकृष्ण मंदिर असलेल्या गोरक्षण संस्थेच्या खोलगट भागाचे सपाटीकरण करण्यासाठी वापरला जाणार आहे.टेकडी गणेश उड्डाण पूल तोडण्याचे सध्या काम सुरू आहे. तेथे आतापर्यंत ११ हजार मे. टन मलबा जमा झाला आहे. हा मलबा धंतोलीतील गोपाळ कृष्णाचे मंदिर असलेल्या गोरक्षण परिसरात टाकला जात आहे.

हा परिसर खोलगट भागात आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. या भागात भर घालण्यासाठी मलब्याचा वापर करण्यात येणार आहे. पूल तोडणा-या कंत्राटदार कंपनीला गोरक्षणकडून मलब्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना निशुल्क स्वरूपात मलबा देण्यात आला आहे. आतापर्यंत १० ते १२ ट्रक मलबा त्या ठिकाणी टाकण्यात आला आहे, येथील गो- शाळा परिसरातील खोलगट भाग सपाटीकरणासाठीही त्याचा वापर करण्यात येणार असल्याचे गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी निरंजन रिसालदार यांनी सांगितले.