नागपूर : काँग्रेस पक्षात अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हायला हवे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली. दीक्षाभूमी येथे भेट दिल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साथला. याप्रसंगी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख उपस्थित होते. थरूर पुढे म्हणाले, मी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी तिघांचीही भेट घेतली. त्यांनी मला कुणीही पक्षाचा अधिकारिक उमेदवार नसल्याचे सांगितले. निवडणूक पारदर्शक व्हावी अशी गांधी कुटुंबाची इच्छा आहे. काँग्रेसची निवडणूक यंत्रणाही पारदर्शी आहे. पक्ष मजबूत व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. मल्लीकार्जुन खरगे यांनी दलित नेते म्हणून उत्तम काम केले असून मी आधीपासूनच त्यांना ओळखतो.
ही निवडणूक युद्ध नसून मैत्रीपूर्ण लढत आहे. लोक म्हणतात माझ्यासाठी निवडणूक कठीण आहे. परंतु मी कधीही अडचणींना बघून पळालो नाही. बऱ्याच सामान्य कार्यकर्त्यांनी मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला. मी त्यांचा आवाज बनू इच्छितो. १७ तारखेला निवडणूक होईल. मला चांगली मते मिळण्याचा विश्वास आहे. जर कुणी मोठा नेता निवडणूक लढल्यास स्वाभाविकच नेते त्यांच्या बाजूने उभे राहतात. परंतु माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षात सकारात्मक बदल हवा आहे. आता युवा नेत्यांना ऐेकण्याची वेळ आहे. कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. ही निवडणूक गोपनीय मतपत्रिकेवर होणार आहे. मोठा नेता असो किंवा कार्यकर्ते सगळ्यांचे एकच मत मोजले जाते. त्यामुळे मला जिंकण्याचा विश्वास असल्याचे थरूर म्हणाले.