पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे आश्वासन देत शेकडोंची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश पटाले असे आरोपीचे नाव असून त्याच्या आधारकार्डवर गोव्याचा पत्ता आहे.शासनाचे घरकूल मिळावे म्हणून शेकडो गरजू श्रमिक आस लावून बसले असतात. स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून काबाडकष्ट करून पैसा जमा करून ठेवतात. श्रमिकांच्या याच पैशांवर एका भामट्याने डल्ला मारला. महेश पटाले या भामट्याने फसवणूक करण्यासाठी चक्क वित्तीय कंपनीच उघडली. सात महिन्यापूर्वी बॅचलर रोडवर कंपनीचे कार्यालय थाटून पंचवीस कर्मचाऱ्यांची भरतीही केली. कंपनीद्वारे पंतप्रधान घरकूल योजनेत घर मिळवून देण्याचे काम होत असल्याचा प्रसार केला.

हेही वाचा – नागपूर : फुटाळ्यातील संगीतमय कारंजी प्रकल्पाला लतादीदींचे नाव – गडकरी

या प्रलोभनास जवळपास दोनशे व्यक्ती बळी पडले. कंपनी बँकेतून पाच लाखांचे कर्ज मिळवून देईल, त्यातील अडीच लाख घरकूल योजनेत माफ होतील, तर उर्वरित अडीच लाख अर्जदाराला मिळेल, असा बनाव त्याने रचला होता. हा अर्ज स्वीकारण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून वीस हजार रुपये वसूल केले. चौदा बँकांशी कंपनीचा करार असल्याचे तसेच विमा, शिक्षण व अन्य क्षेत्रात कंपनीचे काम सुरू असल्याचीही वल्गना केल्या जात होती. अशाप्रकारे घरकुलाच्या नावाखाली तीस लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळण्यात आली. या भामट्याचे बिंग फुटले असून तक्रारकत्र्यांचे जबाब नोंदविणे सुरू आहे. योग्य त्या चौकशीनंतर कारवाई करू, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सचिन यादव यांनी दिली.