हेडगेवारांचा जयंती समारंभ इंग्रजी दिनदर्शिकेनुसार
आतापर्यंत हिंदूतिथीनुसारच म्हणजे गुडीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा प्रथमच ती इंग्रजी दिनदर्शिकेनुसार म्हणजे १ एप्रिल रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानिमित्त नागपूर येथील हेडगेवार यांच्या निवासस्थानी कार्यक्रमही आयोजित केला आहे. संघातील बदलाची प्रक्रिया ही फक्त गणवेश बदलापर्यंतच मर्यादित नाही तर हा बदल व्यावहारिक पातळीवरही दिसून येत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने १ एप्रिलपासून आर्थिक नववर्ष स्वागत दिन व डॉ. हेडगेवार जयंती समारंभ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या दिवशी नागपुरातील महालमधील हेडगेवार यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात संघाशी संबंधित विविध संघटना सहभागी होणार आहेत. संघाने या कार्यक्रमासाठी निवडलेली १ एप्रिल ही तारीख संघातील बदलाची व्याप्ती दर्शविणारी ठरली आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षांला सुरुवात होते. संघाला ही संकल्पना मान्य नाही. त्यांच्यादृष्टीने नवीन वर्ष हे गुडीपाडव्यापासूनच सुरू होते.
हा दिवस संघाकडून दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. तारखेनुसार हेडगेवार यांचा जन्मदिवस १ एप्रिल असला तरी तिथीनुसार गुडीपाडवा असल्याने दरवर्षी संघ हेडगेवार यांची जयंती गुडीपाडव्यालाच साजरी करीत आला आहे. यंदा मात्र संघाने इंग्रजी दिनदर्शिकेनुसार १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षांला मान्यता दिली आहे.
नुसती मान्यताच दिली नाही तर या दिवसापासून एका नवीन कार्यक्रमाची घोषणाही केली आहे. त्यासोबतच नेहमीप्रमाणे गुडीपाडव्याला हेडगेवार जयंती साजरी न करता यंदा १ एप्रिललाच ती साजरा करण्यात येत आहे. गणवेश बदलानंतर इंग्रजी दिनदर्शिकेला मान्यता देण्याचा निर्णय हा संघातील महत्त्वाचा बदल मानला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा