नागपूर : आषाढी एकादशीच्या यात्रेकरिता पंढरपूरला विदर्भातून जाणाऱ्यांची मोठी संख्या असल्याने भाविकांसाठी रेल्वेने नागपूर, अमरावती, खामगावमधून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी देखील या ठिकाणाहून विशेष गाडी सोडण्यात आली होती. आषाढीसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय आल्याने पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची मोठी सोय झाली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदा बुधवार, १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे १२ जुलैनंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असणार आहे. परंतु, पंढरपूरला जाणाऱ्या मोजक्या रेल्वे गाड्या असल्यामुळे भाविकांची अडचण होते. या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू व्हायला हव्यात, अशी विदर्भातील भाविकांची मागणी होती. त्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून विशेष गाड्या सुरू करण्याची विनंती केली. ‘विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आषाढीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. भाविकांची संख्या बघता विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची आवश्यकता आहे,’ असे गडकरी यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेऊन रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे वैदर्भीयांची पंढरपूर वारी सुकर होणार आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विचारताच पंकजा मुंडे म्हणाल्या…
रेल्वेसोबतच एसटी महामंडळाने देखील एसटीच्या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातूनच एसटी बस उपलब्ध करून देण्याचेही नियोजन केले गेले आहे.
१४ जुलैपासून धावणार रेल्वे गाड्या
नागपूर, अमरावती व खामगाव अशा तीन ठिकाणांहून या गाड्या सुटणार आहेत. नागपूर येथून १४ व १५ जुलै, अमरावती येथून १३ व १६ जुलै तर खामगाव येथून १४ व १७ जुलैला या गाड्या सुटणार आहेत. या तिन्ही गाड्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधून जाणार आहेत, हे महत्त्वाचे. याशिवाय १८ व १९ जुलैला मिरज ते नागपूर अशा परतीच्या मार्गावरील गाड्या धावणार आहेत. गेल्या वर्षी देखील या शहरातून गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या.