लोकसत्ता टीम

नागपूर : सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानामुळे रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढण्यापासून वंचित राहिलेल्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना उमरेड राखीव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. दलित महिलेवरील अन्यायाचे प्रतीक म्हणून बर्वेंची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रश्मी बर्वे यांना रामटेकमधून उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. याच आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा नामांकन अर्ज रद्द केला होता. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली होती व ते विजयी झाले.

आणखी वाचा-“अहंकाराचा गंध येतोय” म्हणत उच्च न्यायालयाची प्रधान वनसचिवांना अवमानना नोटीस, मात्र तासाभरातच….

दरम्यान, बर्वे यांनी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने समितीचा निर्णय असंवैधानिक ठरवत तो रद्द केला व बर्वे यांना जात प्रमाणपत्र बहाल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य शासनाची नाचक्की झाली. ती पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण तेथेही बर्वे यांच्याच बाजूने निर्णय लागला. विशेष म्हणजे, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने समितीला चांगलेच फटकारले होते.

सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे नमून प्रशासनाने एका दलित महिलेला जाणीवपूर्वक निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवले, असा आरोप काँग्रेसने केला होता. विधानसभा निवडणुकीत दलित महिलेवर केलेल्या महिलेचा मुद्दा लावून धरण्यासाठी व या माध्यमातून भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमरेडमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-वंचितचे पश्चिम वऱ्हाडातील तीन उमेदवार जाहीर, मूर्तिजापूरमधून सुगत वाघमारे यांना संधी; पाचव्या यादीत १६ जागांचा समावेश

उमरेड हा राखीव मतदारसंघ आहे.२०१९ मध्ये काँग्रेस येथून विजयी झाली होती. काँग्रेसचे राजू पारवे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा पराभव केला होता.पण नंतर राजू पारवे यांना भाजपने रामटेक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देतो म्हणून काँग्रेस सोडायला लावली. ऐनवेळी त्यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. त्यात त्यांचा पराभव झाला होता.