अनेक वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी नाराज ; तीव्र विरोध
देवेश गोंडाणे
नागपूर : महिला व बालविकास विभागाअंतर्गत सरळसेवेने भरली जाणारी बालविकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) व समकक्ष पदे आता राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरली जाणार असल्याची माहिती समोर येत असल्याने अनेक वर्षांपासून सरळसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) व समकक्ष पदे ही अनेक वर्षांपासून सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून घेतली जातात. निवडक पदवी किंवा पदव्युत्तर धारकांसाठी ही पदे असतात. त्यामुळे या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व वयाची अर्हता पूर्ण करणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करतात. मात्र, आता अचानक यात बदल करून ही परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ‘एमपीएससी’ची परीक्षा पद्धती वेगळी आहे. आता अचानक सेवा प्रवेश नियमावली बदलवून ही पदे राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत समाविष्ट करण्यासंबंधी सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून सरकारला निवेदन पाठवत ही भरती प्रक्रिया सरळसेवेच्या माध्यमातूनच घेतली जावी, अशी मागणी केली जात आहे.
नाराजी का?
‘एमपीएससी’ आणि सरळसेवा परीक्षा पद्धतीमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांकडून या निर्णयाला विरोध होत आहे.
थोडी माहिती…
सरळसेवेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षेची रचना ही २०० गुणांसाठी १०० प्रश्न, अशी असून राज्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात.
बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) व समकक्ष पदांसाठी विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करीत आहेत. आता अचानक ही पदे एमपीएससीमार्फत भरल्यास तो विद्याथ्र्यावर अन्याय ठरेल. शासनाने याचा पुनर्विचार करावा.
– अतुल खोब्रागडे, विद्यार्थी कार्यकर्ता.