लोकसत्ता टीम

बुलढाणा: जिल्ह्यातील मलकापूर येथे काल (दि. २४) रात्री साडे दहा वाजेपर्यंत चाललेली एआयएमची सभा चांगलीच गाजली व अपेक्षेप्रमाणे वादग्रस्तही ठरली. या सभेत कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावरून निर्माण झालेल्या वादात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने उडी घेतली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, सार्वत्रिक झालेल्या व्हिडीओ’ची पडताळणी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहे.

मलकापूरमधील दारूल उलूम युसिफिया मदरसा मागील मैदानात रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या सभेला सुरुवात झाली. खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भाषणादरम्यान ‘जब तक सुरज चांद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महत्वाचा मुद्धा मांडत असलेल्या खा ओवेसी यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकायला तयार नसल्याने अखेर त्यांनी ‘रहेंगा, रहेंगा’ असे सांगून आपले भाषण सुरू केले.

आणखी वाचा-विहिरीत आढळला आशा वर्करचा मृतदेह; पालोरा येथील घटना

दरम्यान या घोषणेचा व्हिडीओ वेगाने सार्वत्रिक झाला. आज बजरंग दल, विहिंपने याचा तीव्र निषेध केला. संघटनेचे नेते अमोल अंधारे यांनी ‘ छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराजांच्या भूमीत औरंगजेबाचे हे उदात्तीकरण निषेधार्थ असल्याचे सांगितले. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे, पोलीस विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी , व्हिडीओची पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले. याप्रकरणी तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल ,असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले खा.ओवैसी

यावेळी खासदार ओवेसी यांनी समान नागरी कायद्याला आमच्यासह मुस्लिम समाजाचा कायम विरोध राहील. हा कायदा आम्ही कदापि मान्य करणार नाही, असे ठणकावून सांगत, ‘शांतता पाळा, पण दवाब स्वीकारू नका’ असे आवाहन केले. मागील तीनचाकी (आघाडी) सरकार व सध्याचे ‘डबल इंजिन’ सरकार सारखेच आहे. उद्धव ठाकरेच काय शरद पवार राहुल गांधी हे देखील जातीयवादी असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

दरम्यान, सभेनंतर परत जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागात घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला. सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Story img Loader