रवींद्र जुनारकर
चंद्रपूर : राज्यातील सत्तांतरानंतर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा राजकीय वर्तुळासोबतच समाजात व समाज माध्यमांत चर्चेत आहे. आता तर सार्वजनिक उत्सवातदेखील या घोषणेचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘पन्नास खोके, एकदम ओके’, असे लिहिलेल्या टी-शर्ट आल्या आहेत. या ‘टी-शर्ट’ राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पायउतार झाले. तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोवा, अशी पंचतारांकीत सहल करून मुंबईत परतले. यादरम्यान गुवाहाटीमध्ये असताना आमदार शहाजी बापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ हा अस्सल माणदेशी भाषेतील संवाद चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा : वाजत गाजत ‘नागपूरच्या राजा’ला निरोप
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्या संवादाचा संदर्भ देत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही नवी घोषणा दिली. ही घोषणादेखील इतकी प्रसिद्ध झाली की, ती राजकारण्यांसह सर्वसामान्यांच्या तोंडून ऐकायला मिळते आहे. विशेष म्हणजे, दहीहांडी आणि पोळ्यानिमित्त आयोजित मारबत मिरवणुकीतही ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा गाजली. आता तर गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी या घोषणेचा उल्लेख असलेल्या टी-शर्टही आल्या आहेत. या टी-शर्ट सर्वत्र दिसताहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या टी-शर्ट परिधान केल्यामुळे ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा पुन्हा चर्चेत आली आहे.