नागपूर : गोंदिया वनविभागाअंतर्गत चिचगड वनपरीक्षेत्रातील, मलकाझरी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८०२ राखीव वनामध्ये गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना शुक्रवारी वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. वाघाच्या मृत्यूचे ठिकाण गावापासून दुर्गम क्षेत्रात डोंगराळ भागात आहे. वाघाच्या मानेवर व चेहऱ्यावर दुसऱ्या वाघाचे सुळे दाताचे निशान होते. त्यामुळे आपसातील झुंजीत हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडुन निर्गमीत केलेल्या नियमावलीनुसार वाघाचे शव विच्छेदन व पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यासाठी गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक यांचे स्तरावर समिती गठीत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षकांसह प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच मुख्य वन्यजीव रक्षकाचे प्रतिनिधी म्हणून सावन बाहेकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून रुपेश निंबार्ते घटनास्थळी पोहोचले. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृत्युचे ठिकाण गावाजवळील जंगलात सात ते आठ किलोमीटर अंतरावर मलकाझरी बिटातील कक्ष क्रमांक ८०२ राखीव वनक्षेत्रात आहे. वाघाचा मृत्यू हा अंदाजे चार ते पाच दिवसापुर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचे शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. तर वाघाच्या मानेवर व चेहऱ्यावर दुसऱ्या वाघाचे सुळे दातांचे निशान असल्याचे दिसून आले.
सदर क्षेत्रात ३०० ते ४०० मीटर परिसरात पाहणी केली असता, वाघाचा मृतदेह हा झुंज झाल्याच्या स्थळापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर होता. तसेच मृत वाघाला नैसर्गीक पाणवठयाकडे ओढत नेल्याच्या खुणादेखील दिसून आल्या. वाघाच्या मागील पायाचा भाग हा दुसऱ्या वन्यप्राण्याने खाल्ले असून जागेवर हाडे शिल्लक असल्याचे दिसून आले. समितीचे निरीक्षणानुसार सदर वाघाचे संभाव्य मृत्युचे कारण हे इतर वाघाच्या झुंजीमध्ये झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर वाघाच्या मृत्युप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचगड यांच्याकडुन वनगुन्हा जारी करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, नवेगांवबांध आणि वनपरीक्षेत्र अधिकारी, चिचगड यांचे स्तरावर सुरु आहे.