गणेशोत्सवाचा उत्साह काही दिवस आधीपासूनच बाजारपेठेत सुरू झाला आहे. नैसर्गिक सजावटीऐवजी झटपट होणाऱ्या कृत्रिम सजावटीकडे भक्तांचा ओघ वाढल्याने बाजारपेठही तशीच सजली आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी कितीही ओरड केली तरी झटपट सजावटीचा मार्ग म्हणून कृत्रिम आणि तयार सजावटीला मागणी आहे.
प्लॅस्टिक हा पर्यावरणाला सर्वाधिक मारक घटक आणि याच प्लॅस्टिकचा वापर आता मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. नैसर्गिक आणि विविधरंगी फुलांनी केली जाणारी व दररोज बदलत जाणारी आरास कधीचीच बाद झाली आहे. त्याऐवजी आता तयार आणि त्याहूनही अधिक आकर्षक प्लॅस्टिकच्या फुलांची आरास बाजारपेठेत आली आहे. त्यामुळे सांगितलेल्या आकाराची तयार आरास बाजारात अवघ्या काही क्षणात उपलब्ध करून दिली जाते. केळी किंवा कर्दळीचे खांब आणि त्याचेच छत ही काही वर्षांपूर्वी गणेशाचे विराजमान होण्याचे स्थान. मात्र, आता त्यातसुद्धा बदल झाला आहे. थर्माकोलच्या वैविध्यपूर्ण मखरांनी त्याची जागा घेतली आहे. केळी आणि कर्दळीचे खांबसुद्धा आता प्लॅस्टिकचे मिळायला लागले आहेत. नैसर्गिक आरास उजळली जात होती ती मातीच्या दिव्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या वातींनी, पण मातीचे दिवे कधीचेच लोप पावले असून विजेच्या माळा गणेशोत्सवाला प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्यावरणाला घातक प्लॅस्टिकपासून त्या वस्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात असून त्याचा वापर गणेशोत्सवात केला जातो. सध्या नागपूर शहरातील बाजारपेठ अशाच वस्तूंनी सजली आहे. पर्यावरणवाद्यांनी कितीही ओरड केली तरी दरवर्षी बाजारपेठेतील त्यांचे महात्म्य वाढतच आहे. घरगुती बाप्पांसाठी ५०० रुपयांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता हजारोंचा आकडा ओलांडणारे मखर बाजारात उपलब्ध आहेत. रंगीत आसने, पाट, रंगबिरंगी माळा, मुकूट या वस्तूसुद्धा १०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. विजेच्या माळासुद्धा ५०-६० रुपयांपासून तर पुढे अशा उपलब्ध आहेत.

Story img Loader