गोंदिया : जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. यंदा भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याने, या मोहिमेची छाप घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दिसून येत आहे.
घरगुती देखाव्यासह सार्वजनिक देखाव्यामध्येही चांद्रयान, विक्रम लँडर आणि चंद्रावरील छायाचित्रांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील किल्ला वॉर्ड येथील रहिवासी गणेश तुलाराम सिंगनजुडे आणि हितेश सिंगनजुडे यांच्या घरी चांद्रयान ३ ची प्रतिकृतीअंतर्गत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. हे आकषर्णाचे केंद्र ठरत आहे.
भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याचा आनंद सर्वत्र आहे. आजच्या तरुण पिढीला या दिवसाची आठवण कायम मनात स्थान करून आहे. एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे, या अनुषंगाने यंदा सर्व घरगुती गणेशोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चांद्रयान मोहिमेची आरास साकारली आहे. या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडलेल्या अनेक गणेश भक्तांनी ही आरास साकारून ही मोहीम आपल्या हृदयावर कायम कोरून ठेवली आहे. यापूर्वी केवळ संगितावर चालणारे लाइटिंग असायचे, पण नंतर हळूहळू घरोघरी छोटे छोटे देखावे अनेकजण करताना दिसत आहेत. यंदा या घरगुती गणपतीमध्ये सर्वाधिक देखावे हे चांद्रयानाचे असल्याचे दिसून येत आहे.
घरातील आबाल वृद्धांच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी एक थीम घेऊन दरवर्षी छोटेखानी देखावा करताना हल्ली सर्वजण दिसतात. त्यातून समाज माध्यमांमुळे या क्रिएटिव्हिटीला अधिकच भर आला आहे. यात समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या क्रिएटिव्हिटीला लाईक, शेअर आणि कमेंट्स मिळतात. त्यामुळे एक प्रकारे यंदा गणेशोत्सव काळात चांद्रयान बनवण्यासाठी अनेकांनी लढवलेली शक्कल खरेच कौतुक करण्यायोग्य आहे. तिरोडा येथील किल्ला वॉर्ड येथील रहिवासी गणेश तुलाराम सिंगनजुडे आणि हितेश सिंगनजुडे यांच्या घरी चांद्रयान ३ ची प्रतिकृतीअंतर्गत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
रॉकेट, मागे पडदा लावून तयार केलेले अंतराळ, त्यात ग्रह तारे, चंद्रावर पोहोचलेले चांद्रयान. या सगळ्यांच्या प्रतिकृती पुठ्यावर रंगीत चमकणारे घोटीव कागद लावून बनवण्यात आले आहेत, अशी संकल्पना केली आहे. ढगांसाठी कापसाचा वापरही केला असून हे आकषर्णाचे केंद्र ठरत आहे. तर गोंदिया येथील शिवाजी चौकातील सार्वजनिक मंडळाने चक्क विक्रम लँडर चंद्रावर पोहोचत असल्याचा देखावा तयार केले आहे.