लोकसत्ता टीम
नागपूर: महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगने कठीण झाले असतांनाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास भाड्यात मोठी वाढ केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत १ ते १८ मार्च दरम्यानच्या काळात मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठी घट झाली आहे. या मुद्यावर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने महामंडळाचे कान टोचले आहे.
महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात हतबल ठरले आहे. बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तात्काळ श्वेत पत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या थकित रक्कमा देण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
महामंडळाची एकूण थकित देणी व कर्मचाऱ्यांची एकूण थकित याची सविस्तर माहिती विषद करत बरगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, एसटीची एकूण थकीत देणी सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली असून प्रलंबित थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. एसटीने हल्लीच १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली. परंतु मागील वर्षाची मार्च महिन्यातील १ मार्च ते १८ मार्चची एकूण आकडेवारी व त्याच कालावधीतील या वर्षीची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीच्या नंतर ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसांचे सरासरी उत्पन्न ३१ कोटी ७४ लाख इतके यायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन सरासरी २७ कोटी ६६ लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षी याच काळात प्रवाशी संख्या प्रति दिन ४१ लाख इतकी होती. त्यात प्रतिदिन ३ लाखांनी घट झाली असून ती प्रतिदिन ३८ लाखांवर आली आहे.
अजूनही दिवसाला साधारण ४ कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.याचाच अर्थ भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे एकंदर आर्थिक परिस्थितीचा विचार करता एकूण थकीत रक्कम व थकीत देणी ही देण्यासाठी निव्वळ महामंडळ स्थरावर काहीही साध्य होणार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही याची पूर्णतः खात्री झाली आहे. त्या मुळे शेवटचा पर्याय म्हणून शासनाचेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.