कल्याण – कल्याण पश्चिमेतील चिकणघरमधील होली क्राॅस रुग्णालयासमोरील सहदुय्यम निबंधक दोन दस्त नोंदणी कार्यालयात मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची दस्त नोंदणी होत नसल्याने वकिलांसह नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दस्त नोंदणीसाठी कार्यालयातील कारकुनाला दररोज आळीपाळीने काम दिले जाते. त्यात सुसुत्रता नसल्याने सहदुय्यम निबंधक कार्यालयातील गोंधळाला सुमार राहिलेला नाही.
नागरिकांच्या मालमत्ता खरेदी प्रकरणात व्यत्यय नको. त्यांना सुट्टीच्या दिवशीही आपली घर खरेदी, विक्रीची कामे करता यावीत, शासनाचा महसूल वाढावा म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुट्टीच्या दिवशीही सहदुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी काढले आहेत. त्याच्या विपरित काम कल्याणमधील चिकणघर येथील होली क्राॅस रुग्णालयासमोरील सहदुय्यम निबंधक दोन कार्यालयात सुरू आहे. या कार्यालयातील सहदुय्यम निबंधक गोरखनाथ सातदिवे यांनी डोंबिवलीतील ६५ महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून बेकायदा इमारती उभारणाऱ्या प्रकरणातील, २७ गाव भागातील बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी केली आहे.
हेही वाचा – नागपूर: नवरी निघाली चार महिन्यांची गर्भवती; नवरदेवाने डोक्यावर हात मारून घेतला अन् …
या नियमबाह्य कामाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच पुणे येथील नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनावणे यांनी सातदिवे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. पोलिसांच्या एसआयटीचे प्रमुख इंद्रजित कर्ले यांनी त्यांना नोटीस पाठविली होती. सातदिवे यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत किती नियमबाह्य दस्त नोंदणी केली याची चौकशी सुरू केली आहे. सातदिवे यांच्या जागी प्रभारी सहदुय्यम निबंधक नोंदणी मुद्रांक विभागाकडून नेमणे आवश्यक होते. सातदिवे यांनी केलेल्या गोंधळाचा फटका आपणास नको म्हणून सहदुय्यम निबंधक कार्यालयात कोणीही सहदुय्यम निबंधक प्रभारी म्हणून काम करण्यास तयार नाही. सुरुवातीला इतर कार्यालयांमधील सहदुय्यम निबंधक येऊन एक ते दोन दिवस येऊन बसत होते. तेही आता येणे बंद झाले आहे. सहदुय्यम निबंधक कायार्लयातील कारकून आता सहदुय्यम निबंधक पदाचा पदभार सांभाळत आहेत. त्यांना अधिकृतपणे कोणताही अधिकार नसल्याने ते दस्त नोंदणीसाठी पुढाकार घेत नाहीत. याशिवाय सातदिवे यांनी नियमबाह्य केलेल्या दस्त नोंदणीची तपासणी पथकांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा शेक आपणास नको म्हणून कोणीही सहदुय्यम निबंधक किंवा कारकून दस्त नोंदणीसाठी पुढाकार घेत नसल्याने सहदुय्यम निबंधक कार्यालय दोनमध्ये दस्त नोंदणीसाठी येणारे नागरिक, पक्षकार, वकील, विकासक यांची कोंडी झाली आहे. सातदिवे यांनी कारवाई होण्याच्या अगोदर केलेले सुमारे १०० दस्त चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने तेही ग्राहकांच्या हातात पडले नाहीत. हे दस्त चौकशीच्या पथकात असल्याचे कारण सांगून खरेदी विक्रीदारांना देण्यास कार्यालयातून नकार दिला जात आहे. याप्रकारामुळे अनेकांचा नवीन घरातील प्रवेश, बँकेतून कर्ज घेण्याचे विषय ठप्प झाले आहेत.
सदनिका खरेदी विक्री, विक्री दस्त, इच्छापत्र, भेट दस्त, गाळे विक्री असे सर्व प्रकारचे व्यवहार मागील दोन महिन्यांपासून ठप्प आहेत, अशी माहिती या कार्यालयात दस्त नोंदणी कामासाठी नियमित येणारे कल्याण मधील ॲड. पी. डी. पाटील यांनी सांगितले. न्यायालयीन कामासाठीचे काही कागदपत्रे दस्त नोंदणी कार्यालयात अडकले आहेत. त्यामुळे येथे तातडीन अधिकारी नेमावा म्हणून कल्याणमधील महिला वकिलांचा एक गट मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत यांना भेटण्यासाठी ठाणे येथे गेला होता. त्यांनी तेथे सातदिवे यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असे सांगून ठोस आश्वासन देण्याचे टाळले, असे महिला वकिलांनी सांगितले. मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत यांना याप्रकरणी अनेक वेळा संपर्क केला. त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.
हेही वाचा – अमरावती : उद्धव ठाकरेंनी २५ वर्षे मुंबईला लुटले, प्रवीण दरेकर यांची टीका
“मागील दोन महिन्यांपासून कल्याणमधील सहदुय्यम निबंधक दोन कार्यालयात अधिकारी नाही. कारकूनच अधिकारी म्हणून काम करतात. ते दस्त नोंदणीची जबाबदारी घेत नाहीत. या कार्यालयातील दस्त नोंदणी आणि इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.” – ॲड. पी. डी. पाटील, कल्याण.