लोकसत्ता टीम
नागपूर: भविष्यातील संभाव्य वीज आणि इंधनाच्या संकटावर मात करायची असेल तर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे काळाची गरज आहे. सौर ऊर्जा हे भविष्यातील इंधन असून त्याचे पर्यावरण व अर्थव्यवस्थेसाठी असणारे फायदे अनंत आहेत, ही बाब लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संशोधिका डॉ. दीपमाला प्रभाकर साळी यांनी सोलर सेलच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा स्त्रोतावर महत्त्वपूर्ण शोधप्रबंध तयार केला आहे.
‘कॅडमियम टेलुराइड सोलर सेल’वर डॉ. दीपमाला साळी यांनी संशोधन करून माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेच्या निर्मितीवर यशस्वी उपाय शोधून काढला. त्यांनी तयार केलेले ‘सोलर सेल’ दीर्घकालीन वापरात येऊ शकतात. तसेच भविष्यात औद्योगिक वापरासाठी याचा प्रयोग होऊ शकतो.
आणखी वाचा-गोंदिया-गंगाझरी दरम्यान गर्डर लॉन्चिंग ड्रिल…प्रवासी गाड्या उद्यापासून…
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पी.एचडी. संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देते. डॉ. दीपमाला साळी यांनी भौतिकशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी.एचडी. पदवी प्राप्त केली आहे. ‘स्टडीस ऑन लो-रेसिटेटिव्ह बॅक कॉन्टक्ट बफर लेयर्स फॉर थीन फिल्म सीडीटीई सोलर सेल्स’ या विषयावर डॉ. साळी यांनी प्रबंध सादर केले. प्राध्यापक नंदू बी. चौरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. साळी यांनी ५ वर्षात अभ्यासपूर्ण शोध प्रबंध तयार केला.
आणखी वाचा-अमृत ठरतेय विष…चंद्रपूर शहराच्या रस्त्यांवरील खोदकामांमुळे…
संशोधनाचा भविष्यात औद्योगिक प्रयोग
‘महाज्योती’च्या मुख्यालयात व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्याहस्ते डॉ. साळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. साळी यांनी सांगितले की, सौर ऊर्जा हा पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा उत्तम पर्याय आहे. सौर पॅनल सूर्यप्रकाशातून थेट विद्युत ऊर्जा निर्माण करतात. या पॅनेलमध्ये अनेक सोलर सेल असतात. जे प्रकाश ऊर्जेला विद्युत उर्जेमध्ये रुपांतरित करतात. सौर पॅनलमधील सौर सेल सेमी कंडक्टरपासून बनलेले असतात. परंतु, ‘सिलिकॉन’ सौर सेल स्थापित करण्यासाठी प्रारंभिक खर्च जास्त आहे. ‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर संशोधन केले. यात आपण निर्मित केलेल्या ‘कॅडमियम टेलोराईड सोलर सेल’चा खर्च अत्यंत कमी आहे. उपरोक्त सोलर सेल अत्यंत साध्या उपकरणातून केले आहे. तसेच हे सोलर सेल दीर्घकालीन वापरात येऊ शकतात आणि भविष्यात या संशोधनाचा औद्योगिक प्रयोग होऊ शकतो. ‘महाज्योती’च्या अर्थसहाय्याचे पाठबळ आणि मार्गदर्शनामुळे माझ्या संशोधनाला प्रेरणा ठरली, असेही डॉ. साळी म्हणाल्या.
डॉ. दीपमाला साळी या विद्यार्थिनीचे हे संशोधन अभिमानास्पद आहे. त्यांनी ‘महाज्योती’सह देशाचा नावलौकिक वाढवले आहे. -अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री.