हरणाचे मांस विक्री करणाऱ्या चार जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे ही कारवाई करण्यात आली. पूर्णानगर येथे हरणाच्या मांसाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने पूर्णानगर येथील एका झोपडीवर छापा घातला. तेथून हरणाचे १.५ किलो मांस जप्त करण्यात आले.
याप्रकरणी रामेश्वर श्रीराम धांडेकर (२५. रा. जामली, ता. चिखलदरा), सुरेश बुडा कासदेकर (३०, सलोना, ता. चिखलदरा), संजू राजू कासदेकर (३६, रा. सलोना, ता. चिखलदरा) आणि आकाश ओंकार इटके (२२, रा. पूर्णानगर, ता. भातकुली) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने चारही आरोपींना १६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अमरावती, वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, सचिन नवरे, वनपाल माधुरी नितनवरे, वनरक्षक एस.एम. देशमुख, पी.एस. खाडे, व्ही. जे. बन्सोड, सचिन वानखडे, अन्सार दर्गीवाले, कैलास इंगळे, सी.बी. चोले, वाहनचालक संदीप चौधरी यांनी केली.