अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री आणि कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने सर्व १८ जागांवर विजय मिळवला असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलला मोठा हादरा बसला आहे. या पॅनेलला एकही जागा मिळू शकली नाही. या निवडणुकीत रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
सहकार पॅनलची धुरा यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रीती बंड, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे सुनील वऱ्हाडे यांच्याकडे होती, तर शेतकरी पॅनेलचे नेतृत्व खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, सहकार नेते विलास महल्ले, भाजपच्या निवेदिता चौधरी, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केले. दुसरीकडे, जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी वेगळी चूल मांडून बळीराजा पॅनेलच्या माध्यमातून लढत देण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक चुरशीची होईल, असे मानले जात होते, पण मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला.
नागपूर : वादळी पावसामुळे विमानाच्या १ तास आकाशातच घिरट्या
विजयी उमेदवारांमध्ये सहकार पॅनेलचे संतोष इंगोले, किशोर चांगोले, आशुतोष देशमुख, नाना नागमोते, भैय्यासाहेब निर्मळ, प्रताप भुयार, हरीश मोरे, रेखा कोकाटे, अलका देशमुख, प्रकाश काळबांडे, सतीश गोटे, प्रवीण अळसपुरे, श्रीकांत बोंडे, राम खरबडे आणि मिलिंद तायडे यांचा समावेश आहे.
इतर ठिकाणीही महाविकास आघाडीचा दबदबा
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये निवडणूक पार पडली. चांदूर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलला १८ पैकी १७ जागांवर विजय मिळाला. भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले.
अंजनगाव सुर्जीत अनंत साबळे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलला १७ जागांवर तर परिवर्तन पॅनलला एका जागेवर विजय मिळाला. नांदगाव खंडेश्वर मध्ये अभिजीत ढेपे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले. प्रतिस्पर्धी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील परिवर्तन सहकार पॅनलने पाच जागांवर विजय मिळविला. तर दोन अपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्याचवेळी आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वातील शेतकरी एकता पॅनलला या निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागला.
मोर्शीत आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलला दहा तर भाजपचे डॉ. अनिल बोंडे, कॉंग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे, अशोक रोडे यांच्या कष्टकरी पॅनलला पाच जागा मिळाल्या. तिवसा मध्ये यशोमती ठाकूर यांच्या गटाने सर्व १८ जागांवर विजय मिळवला.