नागपूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊन आता बराच काळ लोटला आहे. निवडणूक झाली, निकाल आली आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाली. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी विशेषत: विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. कॉँग्रेससह शिवसेना-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी-शरद पवार गट यांनी भाजपसह इतर विजयी उमेदवांराच्या विजयावर सवाल उपस्थित केला. काही कॉँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी तर थेट उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करत निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली. मात्र पराभूत कॉँग्रेस उमेदवारांच्या या गर्दीत भाजपच्या एका पराभूत उमेदवाराने कॉँग्रेसच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कॉँग्रेसने डबल व्होटिंग करत विजय प्राप्त केल्याचा आरोप केला. न्यायालयाने याप्रकरणी कॉँग्रेसच्या विजयी उमेदवाराला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
या आमदाराविरोधात आरोप
अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण गैरमार्गाने निवडून आल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पठाण यांना नोटीस बजावली आणि भूमिका मांडण्याचे आदेश दिले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केले. विदर्भातील अशा अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच भाजपविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरुद्ध केवळ एकच याचिका आली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार साजीद पठाण याच्या विजयाला आव्हान दिले आहे. यावर न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी पठाण यांना नोटीस बजावून १८ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.
२७ निवडणूक याचिका
विदर्भातील एकूण २७ पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यात, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आलेत. ॲड. आकाश मून व ॲड. पवन डहाट यांच्यामार्फत या याचिका दाखल करण्यात आल्यात.