नागपूर : शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या विकृत युवकाने तब्बल १७ शाळकरी मुलींची अश्लील चाळे केले. काही मुलींनी पालकांकडे तक्रारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हे दाखल करुन आरोपी युवकास अटक केली. रवी प्रकाश लाखे (३२, गंगाविहार कॉलनी, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच नागपुरातील एका विकृत समूपदेशकाने तब्बल १५० मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती, हे विशेष.
नागपुरातील नंदनवन परिसरात नामांकित शाळा आहे. या शाळेच्या बाजुला शालेय साहित्य विक्रीचे (स्टेशनरी) दुकान आहे. या दुकानाचे शटर नादुरुस्त होते. त्यामुळे दुकानमालकाने रवी लाखे याला शटर दुरुस्तीसाठी बोलावले होते. रवी लाखे हा मॅकेनिक असून त्याचा शटर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तो शनिवारी दुपारी शाळेजवळील स्टेशनरीच्या दुकाना आला. त्यावेळी दुकानदाराने त्याला शटर उघडून दिले आणि घरी निघून गेला. दरम्यान, रवी हा दुकानात एकटाच होता. विकृत मानसिकतेच्या रवीने काम सोडून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहिला. शाळकरी मुलींकडे वाईट नजरेने बघत होता. एका पालकाने त्याला हटकल्यामुळे तो तेथून दुकानात आला. दुकानाच्या शटरचे काम करायला लागला. दुकान उघडे बघून काही शाळकरी मुली दुकानात आल्या. त्यांनी काही वस्तू मागितल्या. मात्र, रवीने दुकानात कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन मुलींना आत बोलावले. दुकानातील सामान स्वतःच मुलींना द्यायला लागला. तसेच मुलींना नको तेथे स्पर्श करुन अश्लील चाळे करीत होता. काही मुलींनी घाबरुन तेथून पळ काढला. जवळपास दोन तासांच्या वेळेत १७ मुली दुकानात आल्या. रवीने सर्व मुलींना पैसे न घेता बिस्किट-चॉकलेट दिले. त्यानंतर आत बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे केले.
अशी आली घटना उघडकीस
रवीने केलेल्या कृत्यामुळे काही मुली घाबरल्या. दोन मुलींनी शाळेत घ्यायला आलेल्या पालकांना रवीने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. त्यामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर शाळा प्रशासनाला जाग आली. त्यांनी या प्रकरणाची तपासणी केली. तसेच नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रवी लाखेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. मात्र, या घटनेमुळे शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला. त्यामुळे पालक वर्गांत रोष निर्माण झाला आहे.