वर्धा : एमएचसीईटी परीक्षेचा निकाल बारा जून रोजी जाहीर झाला. परंतु अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्ट,कृषी व अन्य अभ्यासक्रमाचे प्रवेश खोळंबले आहे. परिणामी या व्यावसायिक शाखेसाठी इच्छूक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात प्रवेश घेवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. हा विलंब कशासाठी, असा सवाल चर्चेत आहे.
खासगी विद्यापीठाच्या भल्यासाठी तर सीईटी सेल कडून विलंब होत नाही ना,असा प्रश्न चर्चेत आहे. राज्यातील खासगी विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रिमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन अर्थात पेरा ही प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते.गतवर्षी एमबीए सीईटीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर एक महिन्याने एमबीए अभ्यासक्रमाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश खाजगी विद्यापीठात निश्चित केला होता,असे प्रवेश विषयक घडामोडींशी संबंधित एकाने निदर्शनास आणले.आताही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने शंकेला पेव फुटले आहे.