लोकसत्ता टीम
चंद्रपूर : अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, दिल्लीच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिछवे (२९) यांच्या घरी छापा टाकून ‘एमडी व एलएसडी ड्रग्ज’ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्ली येथील एका अंमलीपदार्थ प्रकरणाचा शोध घेताना हे पथक चंद्रपूरपर्यंत पोहचल्याने या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अभियंता बिछवे यांना अटक करून दिल्ली येथे नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून पोंभूर्णा येथे पोहोचवण्यात आले होते. या छाप्यात बिछवे यांच्या घरी ३ ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले तर एलएसडी ड्रग्जचे २४ पोस्ट कार्डची तिकीटे मिळाली. यातील एक पोस्टकार्ड तिकीट हे तीन हजार रुपयांचे आहे. या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. अभियंता बिछवे नागपुरातील रहिवासी आहेत.