धारणी तालुक्याला मध्यप्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर जिल्हयात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली असून या मागणीसाठी मध्यप्रदेशच्या सीमेवर भोकरबर्डी गावाच्या वनतपासणी नाक्यावर पाच गावांतील नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात भोकरबर्डी, धूळघाट, खापरखेडा, बेरदा बल्डा आणि चिंचघाट या गावातील सरपंच आणि नागरिक सहभागी झाले होते. या मागणीमुळे महाराष्ट्र आणि मेळघाटातील सीमावाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा- मोठी बातमी! नागपुरातील संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी
आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून मेळघाटात विकास कामांसाठी आजवर कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. परंतु तरीही मेळघाटातील परिस्थिती बदललेली नाही. धारणी तालुक्यातील बहुतांश गावे मध्यप्रदेशातील जिल्ह्याच्या ठिकाणाहून अवघी ८० किलोमीटर अंतरावर आहेत, तर अमरावती मुख्यालयी जाण्यासाठी किमान दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही रस्ते व इतर सुविधा नाहीत, त्यामुळे धारणी तालुक्यातील गावे मध्यप्रदेशात समाविष्ट करावीत, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. कुपोषणाच्या नावावर आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, तरीही कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. विकासाच्या नावार आलेला निधी गेला कुठे, हा प्रश्न उपस्थित करीत मेळघाटातील तापी नदीकाठच्या गावकऱ्यांनी मध्यप्रदेशची सीमा जवळ असल्यामुळे आमच्या गावांचा समावेश मध्यप्रदेशात करावा, अशी मागणी रेटून धरली आहे.
चौकट २४ गावांत वीज नाही, ७० गावांत रस्ते नाहीत
मेळघाटातील २४ गावांना अद्यापर्यंत वीजपुरवठा करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. ७० गावांत मुख्यालयाला जोडणारे रस्ते नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचण्यासाठी आदिवासींना दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तेथे गेल्यावर वेळेत कामे होत नसल्याने मुक्काम करण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागते. हा खर्च करण्याची आदिवासींची ऐपत नाही. बऱ्हाणपूर, खंडवा हे जिल्हे केवळ ८० किलोमीटर अंतरावर आहेत. ते सोयीचे असल्याचे श्रीपाल पाल यांनी निवेदनात म्हटले आहे.