बुलढाणा : मणिपूरमधील घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांतर्फे आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आभाळातून बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोर्च्यामध्ये सहभागी झाले.

मोर्च्याच्या अग्रभागी अर्धनग्न अवस्थेत आपला रोष व्यक्त करणारे युवक मोर्च्याचे वैशिष्ट्य ठरले. मणिपूर घटनेतील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासह अन्य पूरक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. आज दुपारी जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून जोरदार घोषणाबाजी करत या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान कोकाटे, अ.भा. आदिवासी परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा नंदीनी टारपे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा – “मुख्याधिकारी हटाव”साठी एकवटले यवतमाळकर; नगर पालिकेत लोकांनीच केली जनसुनावणी, समस्यांची शेकडो निवेदने

हेही वाचा – “संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

गांधी भवन, जयस्तंभ चौक, स्टेट बॅंक चौक मार्गे निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बिरसा क्रांती दल, अध्यक्ष भगवान कोकाटे, अ.भा. आदिवासी प्रदेश अध्यक्षा नंदीनी टारपे, एकलव्य संघटनांच्या प्रतिनिधींनी मोर्चाला संबोधित केले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.