गडचिरोली : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीयच अडकल्याने त्यांना मंगळवारी राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यात एक मंत्रिपद रिकामे झाल्याने संधी हुकलेल्यांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहे. गडचिरोलीतून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळेल अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र, ऐनवेळेवर त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतून वागळण्यात आले.

मागील सरकारमध्ये आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी होती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असताना देखील आत्राम यांना वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताच अजित पवार गटाच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी अजित पवार गटातील नेत्यांमध्ये कालपासूनच मंत्रिपदासाठी रस्सीचेच सुरु झाल्याची माहिती आहे. त्यात छगन भुजबळ पाठोपाठ धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

समर्थक मुंबईत दाखल

मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि आत्राम समर्थक पदाधिकारी मुबंईत दाखल झाले आहे. आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे अशी त्यांची मागणी आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे धर्मरावबाबा आत्राम आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. तर दुसरीकडे नाराज छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.