भंडारा: तरुणीकडून वारंवार पैशाची मागणी केली जात असल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील उमरी / मोहघाटा जंगलात उघडकीस आली. या प्रकरणी तरुणीसह तिला सहकार्य करणा-या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश रामकृष्ण वाघाडे (३२, रा. उमरी / लवारी ता. साकोली ) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे हजारो अनुयायांनी घेतले दर्शन; ‘जयभीम’च्या घोषणांनी निनादली दीक्षाभूमी

हेही वाचा >>> अकोला: अकोटमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भाजपची साथ; अकोला जिल्ह्यात पं.स. सत्तासमीकरणात सोईचे राजकारण

राजेशची लग्नापूर्वी अस्मिता सिताराम भोयर  (२३, रा. कोसबी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया ) हिच्यासोबत मैत्री होती. दरम्यान, राजेशचे लग्न झाल्यानंतरही अस्मिता वारंवार पैशाची मागणी करीत त्याला धमकावत होती. तिच्या त्रासाला कंटाळून राजेश ८ ऑक्टोबर रोजी कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेला. तो बेपत्ता असल्याची तक्रार साकोली पोलिसात नोंदविण्यात आली होती. दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी उमरी / मोहघाटा जंगलात गुराख्यांना राजेशचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या पाठीवरील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी मिळाली. अस्मिता भोयर हिने पैशांसाठी नेहमी मानसिक त्रास दिला व तिलक ठाकरे (२७ रा. लाखांदूर रोड, साकोली)  याने तिला पाठिंबा दिला, तसेच माझ्या परिवाराला उद्ध्वस्त करेन, अशी धमकी दिली. हा त्रास सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. प्रकरणाच्या पडताळणीअंती साकोली पोलिसांनी अस्मिता आणि तिलक ठाकरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोकले करीत आहेत.

Story img Loader