नोटाबंदीचे परिणाम, व्यवसाय क्षेत्र झाले मर्यादित   

नागपूर : दोन वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली  होती. आज दोन वर्षांनंतरही त्याचा प्रभाव पूर्णपणे ओसरला नाही. नोटाबंदीमुळे व्यापारी आणि उद्योगाची झालेली हानी अद्याप भरून निघाली नाही.

नोटाबंदीची घोषणा होताच त्याचा फटका सर्व क्षेत्राला बसला. यामध्ये लाहान उद्योग तर ठप्पच झालेच. रोखीचे व्यवहार कमी झाले. त्यामुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी अडचणीत आले. देशात मंदीचे वातावरण तयार झाले.

अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. लघु आणि मध्यम स्वरूपाचे कारखाने एकतर बंद झाले तर काहींचे व्यवसाय अध्र्यावर आले. नोटाबंदीतून सावरत असतानाच वस्तू व सेवा कर (जीएसटी)आल्याने त्यात अधिक भर पडली. त्यामुळे एकंदरीत गेली दोन वर्षे नोटाबंदीने अनेकांचे कंबरडे मोडले.

दरम्यान, नोटाबंदी करताना ऑनलाईल  व्यवहार करण्यावर सरकारने भर दिला होता. मात्र, या प्रयत्नाला मर्यादित यश आले. शहरी भाग वगळता इतर ठिकाणी अद्यापही ऑनलाईन व्यवहाराला प्रतिसाद नाही. त्नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. गृहनिर्माण आणि बांधकाम व्यवसायावरही याचा मोठा प्रभाव पडला असून नोंदणीच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत फारसे सकारात्मक चित्र अद्याप दिसून आलेले नाही.

केवळ छोटेच नाही तर मोठय़ा उद्योगधंद्यांनाही नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला. फटका सहन करण्यासाठी कंपनीतील कर्मचारी कमी करावे लागले. शिवाय बेरोजगारी वाढली. मात्र, या निर्णयाला दोन वर्षे लोटल्यानंतही फारशी सकारात्मक परिस्थिती कुठेच दिसून येत नाही. अजूनही व्यापारी नोटाबंदीच्या निर्णयामुळे पूर्वपदावर आलेले नाहीत.

‘‘नोटाबंदीपासून सावरायला अजून पाच वर्षे लागतील. बाजारात मंदी कायम आहे. नोटाबंदीनंतर लोकांनी खर्च कमी केला आहे.  त्यामुळे  बाजारात पैसा खेळत नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर  झाला आहे.’’

 – बी.सी. भरतिया, उद्योजक