६२ जणांना लागण ल्ल आशीनगर, मंगळवारी झोनमध्ये प्रकोप
शहरात तब्बल ६२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सात रुग्ण आढळले आहेत. आशीनगर आणि मंगळवारी झोन भागात मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचा प्रकोप झाला आहे.
जानेवारीपासून डेंग्यूविरोधी मोहीम शहरासह जिल्ह्य़ात सुरू करण्यात आली आहे. शहरात जुलैमध्ये डेंग्यूविरोधी महिना अशी मोहीम राबवण्यात आली. एकूण ३५६ रुग्णांचे नमुने मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यापैकी ६२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्यावर्षी जिल्ह्य़ात १३ आणि शहरात चार असे १७ बळी गेले होते. ती परिस्थिती उद्भवू नये, अशी खबरदारी आधीच घेण्यात आली आहे. मंगळवारी आणि आशीनगर झोनमध्ये या आजाराचा प्रकोप जास्त आढळल्याने त्या ठिकाणी सर्वेक्षण, फॉगिंग, डेंग्यू विरोधी प्रचार सुरू करण्यात आल्याचे शहर हिवताप व हत्तीपाय नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी सांगितले.
पावसाळा म्हटले की साथींच्या आजाराचा सुळसुळाट असतो. डासांना पोषक वातावरण याच काळात मिळत असल्याने अनेकपटींनी त्यांची वाढ होते. डेंग्यूने देशभरात थैमान घातले असून गुरुवारी सायंकाळपर्यंत १८ जणांचे प्राण घेतले असा आकडा आहे. उपराजधानीतही या आजाराचे रुग्ण आढळले असून महापालिका हद्दीत एकूण ६२ जणांना लागण झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण पावसाळ्यात ठिकठिकाणी साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा अथवा विल्हेवाट न लावणे होय.
घरातील कुंडय़ांमध्ये पाणी न झिरपता तसेच साचून राहते. मनिप्लॅंट, जोडे, पाणपोई, मडक्यांची खापरे, टायर, लहान मुलांची खेळणी हे सामान अंगणात अडगळीला किंवा माळ्यावर तसेच ठेवून दिलेले असते. त्यात पाणी साचून दहाच दिवसांमध्ये डासांच्या अळ्या दिसायला लागतात. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून तो ‘एडिस इजिप्टी’ या डासाच्या मादीपासून होतो. तो संसर्गजन्य आजार नाही. मादी डासाने अंडी दिल्यास आठ दिवसात डासोत्पत्ती होते. फॉगींगमुळे डास मरतात. मात्र, डासांच्या अंडय़ांना फारसा धक्का पोहोचत नाही. त्यापेक्षा घराबाहेर पाणी साचून राहणार नाही, याची नागरिकांनी काळजी घेतल्यास आजाराला बराच आळा बसेल.
गेल्यावर्षी शहरामध्ये या आजाराने चार जणांचे बळी घेतले. त्या तुलनेत यावर्षी परिस्थिती बरीच नियंत्रणात आहे. गेल्यावर्षी सारखी परिस्थिती यावेळी उद्भवू नये म्हणून जिल्हा आणि शहर पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळीच डेंग्यू विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, शिक्षक आणि विद्यार्थी सोबतीला घेतले आहेत.
जुलाब किंवा डायरिया याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाल्याचे कारण जनजागृती असून स्वच्छतेचे महत्त्व आता प्रत्येकाच्याच मनावर वेगवेगळ्या माध्यमांतून ठसवले गेले आहे. हात स्वच्छ धुवूनच भोजन करणे हे संकेत शहर असो की ग्रामीण असो सर्वत्रच पाळले जात असल्याने जुलाब किंवा डायरियाचे रुग्ण कमी झाले आहेत.
‘कोरडा दिवस पाळा’
घरातील अडगळीच्या वस्तूंना बाहेरची वाट दाखवणे किंवा ते कोरडे करून त्यात डासोत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मंदिर, विहारांमध्ये डेंग्यूविषयी जनजागृती करण्यात आली असून आता गणेश मंडळांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी आठवडय़ातील एकतरी दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन शहर हिवताप व हत्तीपाय नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी केले आहे.