|| महेश बोकडे
रुग्णांची अडवणूक
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने मेडिकल, मेयोत डेंग्यू तपासणीसाठीच्या आवश्यक साधनांचा (किट)तुटवडा जाणवल्यामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळांतून तपासणी करून घ्यावी लागते. याचा खासगी प्रयोगशाळा चालक फायदा उठवत अवाजवी शुल्क आकारत असल्याने रुग्णांची लूट होत आहे. डेंग्यूच्या एनएस- १, आयजीजी, आयजीएम या तपासणीसाठी ८०० ते १,२०० रुपये आकारले जात आहे. या तपासणीची किट ४० ते १८० रुपयांनाच मिळत असताना मनमानी शुल्क आकारले जात आहे. नागरिकांची लूट होत असतानाही आरोग्य विभाग मात्र कोणतीही हालचाल करताना दिसत नाही.
नागरिकांमधील डेंग्यूच्या भीतीचा फायदा घेत खासगी प्रयोगशाळांनी मनमानी तपासणी शुल्क आकारून नागरिकांची लूट सुरू केली आहे. डेंग्यूच्या एनएस- १ अॅन्टीजीन, डेंग्यू आयजीजी, डेंग्यू आयजीएम या तिन्ही तपासणीची किट बाजारात ४० ते १८० रुपयांमध्ये मिळत आहेत, परंतु त्यावर तपासणी करण्याचे खासगी प्रयोगशाळा नागरिकांकडून ८०० ते १००० रुपये शुल्क आकारत आहे.
भीती दाखवण्याचे प्रयत्न
डॉक्टरांनी एखाद्या रुग्णाला डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला दिल्यावर रुग्ण जवळच्या किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या खासगी प्रयोगशाळेत जातो. येथे नमुने घेताना प्रयोगशाळेतील कर्मचारी तुम्ही कुठे राहता, हे विचारतो. पत्ता सांगितल्यावर त्या भागात खूप रुग्ण आढळत असून त्यांच्या प्रयोगशाळेच्या तपासणीत ते सिद्ध होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुग्ण घाबरतो.
वेगवेगळे दर
रामदासपेठ, धंतोली, सेंट्रल अॅव्हेन्यू रोड, गांधीबाग, सक्करदरा, कमाल चौक, धरमपेठ भागातील बहुतांश खासगी प्रयोगशाळासह रुग्णालयांतील प्रयोगशाळेतही डेंग्यूच्या एनएस- १ अॅन्टीजीन, आयजीजी, आयजीएम या तपासणीसाठी १,००० रुपये ते १,२०० रुपये आकारले जातात, परंतु मेडिकल चौक परिसरात व्यावसायिक स्पर्धेमुळे कमी दर आकारले जाते.
शासकीय दर ६०० रुपये
शासनाने २८ सप्टेंबर २०१६ मध्ये डेंग्यूची एनएस- १ आणि मॅक एलायझा या दोन्ही तपासणीचे शुल्क ६०० रुपयांहून अधिक असू नये, असा निर्णय घेतला होता. तरीही अधिक शुल्क घेतले जात आहे.
‘‘मेडिकलमध्ये रुग्णांच्या गरजेनुसार ३,६०० रुपयांत ९० रुग्णांच्या डेंग्यूची तपासणी होईल, अशी किट वेळोवेळी घेतली जाते. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून कायम किट उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.’’ – प्रा. डॉ. दिनकर कुंभलकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मेडिकल, नागपूर.