डेंग्यू नियंत्रणासाठी एकीकडे महापालिकेने घरोघरी साचलेल्या पाण्यातील डासअळींची शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. मात्र शहराच्या विविध भागातील सार्वजनिक जागेवरील टाके आणि खुल्या भूखंडावरील तळ्यांकडे साफ दुर्लक्ष होत असून त्या ठिकाणी डासांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती सुरूच आहे.
शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे सखल भागात तळी साचली आहेत. शिवाय काही सार्वजनिक ठिकाणी मोठे टाके आणि खड्डे असून त्यात पाणी आहे. त्यातून डासांची उत्पत्ती वाढत आहे. ही बाब फक्त झोपडपट्टय़ा किंवा सीमावर्ती भागातच नव्हे तर शहरातील मध्यवर्ती भागातही आहे. सध्या शहरात डेंग्यूची साथ जोरात आहे. लहान मुले यामुळे बळी पडत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन घरोघरी जाऊन डासअळी शोध मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे मोकळ्या जागांवर साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अजनी चौकात असलेल्या टॉवर वॉचजवळील अनेक दिवसांपासून पाणी साचलेले आहे. त्याला हिरवा रंग चढला आहे. शिवाय खामल्यातील अर्धवट बांधलेल्या व्यापारी संकुलाच्या तळघरात पाणी साचले आहे. गोकुळपेठ, मानेवाडा, इंदोरा अशा अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या खडय़ातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. गोकुळपेठ बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो. मात्र, वर्षनुवर्षे तो भाग साफ केला जात नाही आणि त्यामुळे दुर्गधी पसरते.
शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाने बैठकी घेतल्या, अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. मात्र, प्रत्यक्षात कामे होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी डास उत्पत्तीची नवे ठिकाणे सुरू झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला असतो. तो रोज उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विशेषत: सक्करदरा परिसरात असलेल्या बाजारपेठा, गावंडे लेआऊटसमोरील मैदान, बुधवार बाजार, इतवारी बाजार या ठिकाणी कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
या संदर्भात आरोग्य सभापती देवेंद्र मेहर यांनी सांगितले, शहरातील विविध भागात तपासणी करण्याचे आदेश दिले असताना सार्वजनिक ठिकाणी पाहणी केली जाणार आहे. डेंग्यूू अळी नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी फवारणी आणि गप्पी मासे सोडणे इत्यादी कामे करावी, असे निर्देश देण्यात आले. खुल्या भूखंडावर पाणी साचल्याचे प्रकार आढळून आले तर संबंधित भूखंड मालकाला नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा