* सात दिवसात २९ रुग्ण वाढले * नागपूर जिल्हय़ातील ६ रुग्णांचा समावेश

नागपूर : येथील शहरासह पूर्व विदर्भात करोनानंतर आता डेंग्यूही पाय पसरताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, नागपूरच्या शहर आणि ग्रामीण भागात सात दिवसात डेंग्यूच्या ६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर या रुग्णांसह पूर्व विदर्भात सात दिवसात २९ तर १ जानेवारीपासून १४ ऑगस्टपर्यंत १७९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात १ जानेवारी २०२० पासून १४ ऑगस्टपर्यंत आढळलेल्या एकूण डेंग्यूग्रस्तांची संख्याही आता १७९ वर पोहोचली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये २०१९ मध्ये डेंग्यूच्या १,३१६ रुग्णांची नोंद झाली होती. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण रुग्णांमध्ये उपराजधानीतील साडेसहाशेच्या जवळपास रुग्णांचा समावेश होता. यंदा करोनावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाय सुरू असताना डेंग्यूवर नियंत्रणासाठीही कीटकनाशक फवारणी व इतर उपाय सुरू असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. परंतु आता हळूहळू डेंग्यूचेही रुग्ण विभागात वाढत आहेत. नागपूर विभागात साडेसात महिन्यात १७९ डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील ग्रामीणच्या २१ तर शहरातील ४० रुग्णांचा समावेश आहे. यापैकी नागपूर शहरातील एक आणि ग्रामीणच्या एकाचा मृत्यू झाला. विभागातील एकूण १७९ डेंग्यूग्रस्तांमध्ये २१ नागपूर ग्रामीण, ४० नागपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण १०, चंद्रपूर शहर १८, गडचिरोली २, गोंदिया ४, भंडारा ५, वर्धेतील १८ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूचे एवढे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

वर्धा, चंद्रपूरलाही धोका वाढला

गेल्या सात दिवसात वर्धा येथे १०, चंद्रपूर ग्रामीणला १०, चंद्रपूर शहरात ३, नागपूर ग्रामीण १, नागपूर शहर ५ डेंग्यूग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण वर्धा आणि चंद्रपूरला वाढल्याने येथे धोका वाढला आहे. परंतु आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणी सुरू केल्याचा दावा करत घाबरण्याचे कारण नसल्याचा दावा केला आहे.

Story img Loader