लोकसत्ता टीम
नागपूर: नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला नॅकतर्फे ‘ए प्लस’ मूल्याकन प्राप्त झाले आहे. असा दर्जाचे मिळवणारे हे वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे.
शासनाच्या मदतीने येथे अद्ययावत यंत्रांसह तज्ज्ञ, पायाभूत सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडे (नॅक) मूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यानंतर २६ सप्टेंबरला नॅकच्या चमूकडून निरीक्षण करण्यात आले. चमूने येथील उपचाराची सुविधा, अद्ययावत यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग व ऑनलाईन वर्गाला तंत्रज्ञानाची दिलेली जोड, संशोधनाला दिलेला वाव बघत सकारात्मक अहवाल दिला. त्यानुसार महाविद्यालयाला ‘ए प्लस’ मूल्यांकन मिळाले. असे मूल्यांकन मिळवण्यात डॉ. अभय दातारकर, डॉ. ज्योती मनदंदा, डॉ. शुभा हेगडे, डॉ. वसुंधरा भड, डॉ. सुचित्रा गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील सर्वच शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरली.
आणखी वाचा-बुलढाण्यातील शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्र्यानी पाठविली ‘दिवाळी गिफ्ट’
“शासकीय दंत महाविद्यालयाने पाच वर्षांत ६१३ शोध प्रबंध, ५० विविध विषयांचे कॉपी राईट, २१ बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळवले. येथे थ्री डी प्रिंटरसह अद्ययावत यंत्राची सोय आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याचे ए प्लस मूल्यांकन असलेले हे राज्यातील पहिले रुग्णालय आहे.” -डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.